ब्रेकिंग! कर्नाटक हादरले

कर्नाटकातील कोलार जिल्ह्यामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने मोठ्या थाटामाटात प्रेमविवाह केला आणि काही तासांनंतर त्याने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.
यानंतर त्याने याच कुऱ्हाडीने स्वतःवर वार केले, त्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील जवळच्या गावात राहणारे नवीन कुमार आणि लिखिता श्री यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सात ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केले. दोघांचे मित्र आणि नातेवाईक लग्नाला उपस्थित होते. लग्नानंतर दोघांनीही कुटुंबासोबत वेळ घालवला.
यानंतर दोघेही चहा घेण्यासाठी नातेवाईकाच्या घरी गेले. यावेळी नवीन आणि लिखिता यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, दोघांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, नवीन याने लिखिता हिच्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि नंतर त्याच कुऱ्हाडीने स्वतःवर वार केले. यावेळी नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.