सोलापूर

ब्रेकिंग! सोलापुरात लवकरच आयटी हब

सोलापूरमध्ये आयटी पार्क सुरू व्हावे यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेऊन आयटी पार्क उभारणीसाठीचे निवेदन सादर केले आहे. त्यांच्या या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री जितीन प्रसाद यांनी तत्काळ याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव मागवून कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरात आयटी पार्क सुरू व्हावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे आयटी पार्क सुरू होण्याचा मुहूर्त काही लागला नाही. दरम्यान, आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात आयटीपार्क सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा पाठपुरावा सुरू केला आहे. 
यासाठी त्यांनी काल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेतली. याभेटी वेळी त्यांनी सोलापूर येथे आयटी पार्क सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सोयी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच आयटी पार्कमुळे या प्रदेशाच्या आर्थिक विकासात आणि रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय भर पडणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिवाय सोलापुरात आयटी क्षेज्ञातील शिक्षण घेणारी सुशिक्षित तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आयटी उद्योग नसल्याने तरुणांना बाहेरच्या राज्यात स्थलांतरीत व्हावे लागते. परंतु सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याच्या गोष्टीकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले.
तसेच सोलापूरमध्ये आयटी पार्क निर्मितीसाठी प्रकल्पासाठी योग्य असलेली जमीन देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. सोलापूरमध्ये आयटी पार्कच्या स्थापनेमुळे केवळ स्थानिक टॅलेंटचा उपयोग होणार नाही तर शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होईल. तसेच या ठिकाणी इतरही आयटी उद्योगांच्या उभारणीला चालना मिळेल. तसेच हा उपक्रम देशातील डिजिटल विकासाला चालना देण्याच्या योजनेला आणि देशभरात स्मार्ट शहरे निर्माण करण्याच्या सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत असल्याचेही मत खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केले आहे.
दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या या मागणीवर केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. येत्या काळात महाराष्ट्र शासनाकडून सोलापूरमध्ये आयटी पार्क सुरू करण्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव मागवण्यात येईल आणि त्याप्रस्तावानुसार तत्काळ आयटी पार्क उभारणीसाठीची मंजुरी देण्याचे आश्वासनही माननीय मंत्री जितिन प्रसाद यांनी दिले असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button