राज्यात अलीकडे अपघात खूप मोठया प्रमाणात वाढत आहेत. पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्याच्या पूर्वभागातील मांडवगण फराटा गावापासून जवळ असलेल्या कोळपेवस्ती येथे अपघाताची घटना घडली आहे. मालवाहू टेम्पो आणि बाईकच्या धडकेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
श्रावणी देविदास थोरात (वय-१५) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर निरंजन देविदास थोरात (वय १३) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना काल शाळेतून घरी जाताना घडली आहे. तिच्या पाठीमागे बसलेला तिचा भाऊ थोडक्यात बचावला आहे. याबाबत देविदास नानासो थोरात यांनी मांडवगण फराटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावणी ही इयत्ता नववी आणि तिचा भाऊ निरंजन इयत्ता सातवीमध्ये वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत शिकत होते. काल सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ते दोघेही दुचाकी क्रं एम एच १२ ई जी ५१७४ वरुन घरी जात असताना कोळपेवस्ती येथे समोरुन येणारा भरधाव (एम एच ४२ बी पी ३१३२) टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पो चालकाने दोन्हीही मुलांना ५० फुट फरफटत नेले. यावेळी श्रावणी हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच भाऊ निरंजन याला गंभीर जखमी अवस्थेत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक मुलांना मदत न करताच पळून गेला.