क्राईम

इसिसशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवादी रिझवानला अटक

स्वातंत्र्यदिनाआधीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. आयसीस मॉड्यूलच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. रिझवान अली असे या अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याच्याकडे काडतुसांसह एक अत्याधुनिक पिस्तूल देखील सापडले आहे.
अटक करण्यात आलेला दहशतवादी रिझवान हा दिल्लीतील दर्यागंज भागात राहत होता. तो पुणे ईसीस मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार आहे. गेल्या वर्षी जुलै २०२३ मध्ये पुणे पोलिसांच्या तावडीतून तो फरार झाला होता. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए)सह देशातील सर्व यंत्रणा त्याचा शोध घेत होते. तो एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत होता व त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या आठवडाभरापूर्वी ही अटक करण्यात आल्याने मोठा घातपात टळला आहे.
एनआयए व पुणे पोलिसांनी मार्च महिन्यात इसिस मॉड्यूल प्रकरणी पुण्यातील चार मालमत्ता जप्त केल्या होत्या. पुण्यातील कोंढवा येथे असलेल्या या मालमत्तांचा संबंध ११ आरोपींशी असून, तीन जण फरार आहेत. बॉम्ब तयार करणे, प्रशिक्षण देणे आणि दहशतवादी कारवायांची योजना आखण्यासाठी या मालमत्तांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. 

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, मोहम्मद शाहनवाज आलम आदींचा समावेश आहे. रिझवानने महाराष्ट्र, गुजरात आणि भारताच्या इतर भागात दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करणयाचे प्रशिक्षण दिले होते. तसेच दहशतवादी निधी गोळा करण्यासह घातपात करण्याच्या इसिसच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचा दावा एनआयएने केला आहे.

Related Articles

Back to top button