खेळ

टीम इंडियाचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात काल टी-20 वर्ल्ड कपमध्ये हाय व्होल्टेज सामना झाला. यामध्ये टीम इंडियाने अखेर बाजी मारली. टीम इंडियाने हा सामना सहा धावांनी जिंकत आपला दणदणीत विजय साजरा केला. दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या या रोमांचक सामन्यातील विजयासह टीम इंडिया आता पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी केवळ १२० धावांचे लक्ष्य होते, मात्र पाकिस्तानला ७ गडी गमावून केवळ ११३ धावाच करता आल्या. टीम इंडियाच्या गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या जबरदस्त गोलंदाजी करत सामना फिरवला.
बुमराहने ४ षटकात केवळ १३ धावा देत ३ बळी घेतले. हार्दिकनेही फखर जमान आणि शादाब खानला बाद करून टीम इंडियाला सामन्यात परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली. अर्शदीपनेच सामन्यातील शेवटचे षटक टाकले, ज्यामध्ये पाकिस्तानला १८ धावा करायच्या होत्या.
धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत दिसत होता. एकवेळ १४ व्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात ८० धावा होती. पण यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली.  कारण रिझवान आणि शादाब एकामागोमाग बाद झाले.
बुमराह १९ व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ ३ धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली. २० व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १८ धावांची गरज होती. मात्र, अर्शदीपने केवळ ११ धावा देत इमाद वसीमची विकेट घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवले.

Related Articles

Back to top button