क्राईम

राज्यात मध्यरात्री भीषण दुर्घटना

राज्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. सांगलीत मुलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आटोपून घरी परत येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सांगलीच्या तासगाव – मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाले आहे. हा अपघात मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडला.
राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ६०), सुजाता राजेंद्र पाटील (वय ५५), प्रियांका अवधूत खराडे (वय ३०), ध्रुवा (वय तीन ), कार्तिकी (वय एक ), राजवी (वय दोन) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वप्नाली विकास भोसले (वय ३०) या जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील होते. 

हे तासगाव येथील रहिवासी होते. राजवीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय हे तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला.
चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. कार ही थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. या कालव्यात पाणी नसल्यामुळे कालवा हा कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली कार ही कालव्यात आदळली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रात्र असल्याने तसेच हा परिसर निर्मनुष्य असल्याने अपघात झाल्यावर तातडीची मदत मिळाली नाही. 
बुधवारी पहाटे एका व्यक्तीला कालव्यात पडलेली गाडी दिसल्यावर हा अपघात झाल्याचे कळले. यानंतर त्याने याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले. दरम्यान, कार चालवत असताना चालकाला डुलकी लागल्याने त्यांची कार थेट कालव्यात कोसळली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

Related Articles

Back to top button