तहान लागल्याने पाणी प्यायला गेली…
एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.
या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अकदस चंदू नावाच्या नराधमाला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे चंदूने वर्षभरापूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीसोबत असाच प्रकार केला होता. या नराधमाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
कल्याणमध्ये राहणारी एक बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी काल रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास दुकानात केक घेण्याकरता गेली होती. तिला तहान लागली म्हणून ती मुलगी जवळच पाणी पिण्यासाठी गेली. तेवढ्यात तिच्या पाठीमागून एक व्यक्ती आली. त्याने त्या मुलीचे तोंड दाबले. तिला जबरदस्तीने एका ठिकाणी घेऊन गेला. त्याने या मुलीसोबत अतिप्रसंग करायला सुरुवात केली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे नराधमाने तेथून पळ काढला. त्यानंतर मुलीने देखील तेथून पळ काढत घर गाठले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी चंदूला बेड्या ठोकल्या.