क्राईम

राज्यात पैशांचा पाऊस!

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दादर परिसरात एका कारमध्ये एक लाख ८० हजारांची रोकड आढळली होती.

यानंतर आता बीडमध्ये इनोव्हामध्ये तब्बल एक कोटींची रोकड सापडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. बीडमधील गेवराई तालुक्यातील खामगावमध्ये असलेल्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्टवर इनोव्हामध्ये काल रात्री तब्बल एक कोटी कॅश सापडली. ही दहा लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम असल्याने ही रक्कम कोषागार कार्यालयाकडे सुपूर्त केली जाणार आहे. आयकर विभागाचे अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथील बँकेच्या शाखेतून ही रक्कम काढली गेली होती की नाही, याची माहिती घेणार आहेत. संभाजीनगरमधील द्वारकादास मंत्री बँकेच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यावेळी या पैशासोबत संभाजीनगर येथून पैसे बाळगण्याचे परवानगी पत्र होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी बीकेसी परिसरात काल रात्री बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. या कारखान्यात पाच, दहा, शंभर व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाचा साठा जप्त केला.

Related Articles

Back to top button