ब्रेकिंग! वाहतूक शाखेचा दणका

सध्या सोलापूरसह अन्य भागात वाहतुकीचे नियम अत्यंत कडक करण्यात आले आहेत. दरम्यान, बंगळुरुमधील एका बाईक चालकाला वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. वाहतूक पोलिसांनी या व्यक्तीला तब्बल ३.२० कोटींचा दंड ठोठावला आहे.
वाहतूक पोलिसांनी बाईकस्वाराला लवकरात लवकर दंड भरायला सांगितला आहे. प्रलंबित दंड न भरल्यास कारवाईचा इशारा देखील वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत या बाईक चालकाने अनेक प्रकारे वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचे समोर आले होते. चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणे, हेल्मेट न घालणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे इत्यादींसह एकूण ३५० वाहतूक नियम उल्लंघनांची नोंद त्याच्याविरोधात झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी उल्लंघन करणाऱ्या बाईक चालकाच्या घरी जाऊन त्याला नोटीस बजावली.
वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा त्या व्यक्तीला धक्काच बसला. व्यक्तीने सांगितले की, ३.२० लाख रुपयांचा दंड तो भरू शकत नाही. कारण त्याच्या बाईकची सेकंडहँड मार्केटमध्ये किंमतच तीस हजार रुपये आहे. मात्र, पोलिसांनी बाईकचालकाला कुठलाही दिलासा देण्यास मनाई केली आहे.