काँग्रेसने गद्दारांची हकालपट्टी करावी

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, सांगली मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेली कटुता तीव्र होण्याची शक्यता आहे.
सांगलीतील निवडणूक लढण्यासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. काँग्रेसने पाटील यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
सांगली मतदारसंघातून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी, असा हट्ट विशाल पाटील यांनी धरला होता. आमदार विश्वजीत कदम यांनीही त्यासाठी बरीच मोर्चेबांधणी केली. दिल्लीपर्यंत बैठका घेतल्या. मात्र, ठाकरे गट ठाम राहिल्याने अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. परिणामी ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे.
नागपूर दौऱ्यावर असलेल्या राऊत यांना सांगलीच्या परिस्थितीबद्दल विचारले असता त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. एखाद्या पक्षाचे लोक बंडखोरी करून महाविकास आघाडीविरुद्ध काम करत असतील तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केलीच पाहिजे.