ब्रेकिंग! नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करा

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, भाजपा सर्व कायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे.
भाजपाचे नागपूर मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने गडकरी यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
राज्य निवडणूक अधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात लोंढे म्हणतात की, गडकरी यांनी प्रचारात धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपाचा हा प्रकार अनैतिक असून या पोस्टर्सचा वापर काँग्रेसविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठीही केला आहे. निवडणूक आयोगाने तत्काळ त्यांची उमेदवारी रद्द करून भाजपाला योग्य दंड ठोठावावा, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.
सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या झाल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली, पण भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यास घाबरते. यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून निवडणूक आयोग दूर पळत असून केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का, असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.



