ब्रेकिंग! शरद पवार की अजितदादा, कुणाचे आमदार ठरणार अपात्र?

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारनंतर निकालाचे वाचन करणार आहेत. परिणामी शरद पवार की अजितदादा पवार कुणाचे आमदार अपात्र ठरणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
अजितदादा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर अजितदादा गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या.
या याचिकांवर नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. सुनावणीवेळी साक्ष नोंदणी, उलट तपासणी आणि दोन्ही गटांचा अंतिम युक्तीवाद ऐकून घेण्यात आला. ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपल्यानंतर नार्वेकर यांनी निकाल वाचनासाठी सुप्रीम कोर्टाकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता.
मात्र, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी यावर आक्षेप घेत केवळ एका आठवड्याची मुदतवाढ देण्यात यावी, असा युक्तिवाद केला. त्यानंतर, सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. दरम्यान, ही मुदत आज संपत असून, या प्रकरणावर नार्वेकर आजच निकाल देण्याची शक्यता आहे.