- हुंड्यासाठी स्वत:ची गर्भवती पत्नी (२६) आणि सासूला गॅस सिलेंडरचा स्फोट घडवून ठार केल्याच्या आरोपावरून गोवा पोलिसांनी एका नौदल कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
- अनुराग सिंग राजावत असे या आरोपीचे नाव आहे. गोव्यातील वास्को द गामा बंदर शहरातील न्यू वडदेम येथील ही घटना आहे. गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी घरात गॅस गळतीनंतर स्फोट होऊन शिवानी राजावत (२६) आणि तिची आई जयदेवी चौहान (५०) या दोघींचा मृत्यू झाला होता.
स्फोटाची तीव्रता इतकी होती की घराच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या होत्या. हा अपघात असल्याचे सुरुवातीला पोलिसांनाही वाटत होते. मृतांच्या घरच्यांनी मात्र पोलिसांना वेगळी माहिती दिली.
शिवानीच्या भावाने नंतर जिल्हा प्रशासनाकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली. अनुरागने २० लाख रुपयांचा हुंडा मागितला होता. हा हुंडा मिळावा म्हणून तो शिवानी व आमचा छळ करत होता.
त्यामुळे माझ्या बहिणीचा व आईचा मृत्यू हा अपघात नसून घातपात आहे, असे शिवानीच्या भावाचे म्हणणे होते. दरम्यान जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत गोवा पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करण्याचे आदेश दिले होते.
तपासात हा खून असल्याचे समोर आले. पोलिसांनी अनुराग यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) तसेच हुंडाबळी छळवणुकीखाली गुन्हा दाखल केला आहे.