एका तरुणीने एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या लांबच्या नात्यातील भावाची पेट्रोल ओतून हत्या केली. राजधानी दिल्लीतील वजिराबाद परिसरात झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.
दरम्यान पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अब्दुल्ला असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. अब्दुल्ला हा त्याच्या कुटुंबासोबत संगम विहार भागात राहायला होता. तो एका ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता.
अब्दुल्ला याच्या मामाचे कुटुंबही या परिसरात होते. अब्दुल्लाचे त्याच्या मामे बहीणीवर एकतर्फी प्रेम होते. यातून तो तिला सतत त्रास देत असे. हा त्रास सहन न झाल्याने पीडितेने अब्दुल्ला याला निरोप देऊन त्याला घरी बोलावले.
घरात कोणी नव्हते. अब्दुल्ला मामाच्या घरी पोहोचल्यावर बहिणीने त्याला सोफ्यावर बसवले. तसेच चहा आणण्याच्या बहाण्याने आत गेली. काही वेळाने तिने बाटलीत पेट्रोल आणून अब्दुल्लावर ओतले. यानंतर कडीपेटीच्या साह्याने त्याला पेटवून दिले.
आग लागल्यानंतर अब्दुल्ला पळत पळत बाहेर आला. त्याने अंगावरील कपडे फेकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तो बराच भाजला होता. स्थानिक लोकांनी पाण्याच्या साह्याने आग विझवली.
तसेच त्याला दवाखान्यात भरती करत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असतानाच काल पहाटे तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.