क्राईम

संतापजनक! मुलगा न झाल्याने जुळ्या मुलींचा खून

पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगा न झाल्याने बापाने आपल्या जुळ्या नवजात मुलींना विष देऊन मारले. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाने नराधम बाप आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर येथे ही घटना घडली.
नराधम बाप अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, आजोबा बाबासाहेब, आजी जयश्री, काका अमोल सूर्यवंशी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकृष्ण प्रताप लोभे (वय ३५, रा. साई संस्कृती सोसायटी, बायफ रस्ता, वाघोली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी लोभे यांची बहीण उर्मिलाचा विवाह २०१८ मध्ये अतुलसोबत झाला होता. विवाहानंतर मुलगा हवा, अशी उर्मिला हिच्या घरच्यांची इच्छा होती. एवढेच नाही तर मूल गोरे हवे, असे देखील वरील आरोपींनी उर्मिलाला सांगितले होते. लग्नानंतर उर्मिला गर्भवती राहिली. तिच्या घरच्यांना मुलाची अपेक्षा होती. मात्र, त्यांना रिद्धी आणि सिद्धी या दोन जुळ्या मुली झाल्या. यामुळे घरच्यांचा हिरमोड झाला. दरम्यान, २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सिद्धीला वरील आरोपींनी बाहेरील दूध पाजले. या दुधात काहीतरी मिसळले होते.
दूध पाजल्यानंतर सिद्धीची प्रकृती खराब झाली. तिच्यावर उपचार सुरू असताना सिद्धीचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर ६ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपींनी रिद्धीला देखील बाहेरील दूध पाजले. यामुळे रिद्धीची प्रकृती खराब होऊन तिचाही मृत्यू झाला. दरम्यान, दूधात काहीतरी मिसळल्याचा संशय लोभे यांना होता. त्यानंतर लोभे यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यानुसार तपासात पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार खून, कट रचणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश हडपसर पोलिसांना कोर्टाने दिले. चार आरोपींवर त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button