ब्रेकिंग! दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली

राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी अनेक नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता रायगडच्या खालापुरमधून आतापर्यंतची सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे.
रायगडच्या इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला असून १०० जणांचा आणखी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गावावर दरड कोसळल्याने किमान ४० ते ५० घरे मलब्याखाली दबल्याची माहिती आहे. आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले असून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
काल रात्री उशिरापर्यंत रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. त्यावेळी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास इर्शाळवाडी गावावर भली मोठी दरड कोसळली असून यात चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. परंतु ढिगाऱ्याखाली ४० ते ५० घरे असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता घटनास्थळी नागरिकांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.