क्राईम

तू खूप छान दिसतेस…

  • जमीन खरेदीत फसवणूक झाल्याने तक्रार करण्यास गेलेल्या महिलेला कारवाई केल्यावर मला काय मिळेल? असे म्हणत तिला घरी बोलावून घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. राहुरी पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक सजन्नकुमार नाऱ्हेडा याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात आज बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील एका गावातील पीडीत महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    दरम्यान, पोलीस खात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेचे पडसाद आज थेट विधानसभेत उमटले. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत हा अत्याचाराचा हा प्रश्न उपस्थित केला. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले असताना राहुरी मतदारसंघात अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. एक महिला भगिनी तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दोन महिने पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत होती. या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी राहुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाने तिच्याकडे पैश्याची मागणी केली. तू खूप सुंदर दिसतेस, असे म्हणत तिची छेड काढली. तसेच संबंधित महिलेला घरी बोलावून अत्याचार केले असल्याचा आरोप या पोलीस निरीक्षकावर असून याबाबत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 
कायद्याचे रक्षकच जर कायद्याचे भक्षक होणार असतील तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय कोण देणार? याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित महिलेला न्याय मिळवून द्यावा तसेच अशा प्रकारे निंदनीय कृत्य करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत अत्याचाराची घटना घडली असेल तर दोषींना बडतर्फ करण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Back to top button