राजकीय
राऊतांचे डोके तपासावे लागेल
राज्यातील राजकारणात वेगळाच मुद्दा चर्चेत आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकाच्या निवडणुकीनंतर देशात आणि राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचा दावा केला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी राऊतांच्या दाव्याची खिल्ली उडवली. राऊतांचे डोके तपासावे लागेल, कारण त्यांनी आजपर्यंत केलेले एकही दावे खरे ठरले नाहीत, असे म्हणत सत्तार यांनी राऊतांच्या दाव्याची खिल्ली उडवली. राज्याचा भावी मुख्यमंत्रीपदावरून आता रस्सीखेच लागली आहे.
अशातच सत्तार यांनी राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याविषयी मुख्यमंत्रिपदाबाबतच्या केलेल्या वक्तव्याचेही स्पष्टीकरण दिले. विखे -पाटील माझे मित्र आहेत, पण त्यांच्याविषयी अशा अफवा विनाकारण पसरवल्या गेल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचे काम उत्कृष्ट आहे, ज्याला मुख्यमंत्री पद देतात त्याला १४५ आमदारांचा आकडा गाठावा लागणारा आहे. शिंदेंचा कार्यकाळ पूर्ण होईल. तसेच २०२४ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालीच मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढू, असेही त्यांनी सांगितले.