राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही पाकिस्तानची इच्छा

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे. दरम्यान, देशात काँग्रेसची सत्ता असताना बॉम्बस्फोट व्हायचे. दहशतवादी गोळ्या झाडायचे.
तेव्हा निर्दोष व्यक्ती मारले जात होते. त्यावेळी दिल्लीतील सरकार पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवत होती, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, यासाठी पाकिस्तानमधील नेते प्रार्थना करीत आहेत, अशी जहरी टीका मोदींनी केली.
मोदी आज झारखंड दौऱ्यावर असून भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांनी पलामू येथील चिआंकी विमानतळ मैदानावर जाहीर सभा घेतली.
देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता. काँग्रेसच्या काळात देशात बॉम्बस्फोट व्हायचे. दहशतवादी गोळ्या झाडून अनेक निष्पाप लोकांना मारायचे. तेव्हा काँग्रेस सरकार पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवत होते. जेवढे लव्ह लेटर पाठवले, तेवढेच दहशतवादी भारतात घुसायचे.
पण २०१४ नंतर परिस्थिती बदलली आहे. हा नवा भारत असून घरात घुसून मारत आहे. सर्जिकल स्ट्राईने पाकिस्तानला हादरवून टाकले. त्यामुळे आता भारताला कुणीतरी रोखावे, असे म्हणत पाकिस्तान जगभर रडत फिरत आहे. मदतीसाठी इतर देशांकडे याचना करीत आहे. मोदींची सत्ता जावी, ही पाकिस्तानची इच्छा असून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, यासाठी पाकिस्तानमधील नेते प्रार्थना करीत आहेत, असे मोदींनी सांगितले.