क्राईम

ब्रेकिंग! होय, आम्हीच संतोष देशमुखांची हत्या केली

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु्ख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट मिळाली आहे. वाल्मिक कराडच्या टोळीतील तिघा जणांनी देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. आरोपींच्या या कबुलीमुळे कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिली आहे.

देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी वाल्मिकसह त्याच्या चेल्यांना अटक केली होती. या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे. देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले होते.

यामध्ये सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे आरोपी होते. या टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याने पोलीस कस्टडीत जबाब दिला आहे. घुले सुरुवातीला या हत्या प्रकरणातील आपला सहभाग नाकारत होता. नंतर पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवला. यानंतर मात्र त्याने बोलण्यास सुरुवात केली. घुलेने आम्हीच देशमुख यांचे अपहरण करुन खून केला, अशी कबुली पोलिसांना दिली आहे.

मयत देशमुख यांनी सुद्धा आम्हाला मारहाण केली होती. आमचा अपमान केला होता. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच देशमुख यांनी आम्हाला मारहाण केली. मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आम्हाला आव्हान दिले होते. देशमुख यांच्या या कृतीचा आम्हाला राग आला होता म्हणून आम्ही त्यांना मारण्याचा प्लॅन आखला होता, असे घुले याने सांगितले.

Related Articles

Back to top button