वनडे क्रिकेटमध्ये सूर्या तळपेना! धावांसाठी करावा लागतोय संघर्ष

न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाचा अखेरचा सामना बुधवारी झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला 219 धावांवर सर्वबाद केले. टी 20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हुकमी एक्का असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव हा या सामन्यात अपयशी ठरला.
सूर्यकुमार हा मागील दोन वर्षात भारताचा प्रमुख टी 20 फलंदाज म्हणून समोर आला आहे. टी 20 विश्वचषकात सूर्यकुमारने भारतासाठी दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या होत्या. विश्वचषकाच्या चारच दिवसानंतर सुरू झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावरील टी 20 मालिकेतही त्याने शतक साजरे केले होते. मात्र, त्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तो अपयशी ठरला आहे.
भारतीय संघाने या वनडे मालिकेतील पहिला सामना गमावला होता. त्या सामन्यात सूर्यकुमारने 6 धावा केल्या. पावसामुळे रद्द झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याला नाबाद 34 धावांचे योगदान देता आले. मालिकेतील अखेरच्या सामन्यात तो सहा धावा बनवू शकला. यामुळे तो संपूर्ण मालिकेत केवळ 44 धावा बनवण्यात यशस्वी ठरला.
सूर्यकुमारच्या मागील सात वनडे डावांचा विचार केल्यास यातील चार डावांमध्ये तो दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 34 राहिली आहे. त्याच्या आजपर्यंतच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकल्यास त्याने 15 सामन्यांमध्ये 34.36 च्या सरासरीने 378 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.