राज्याला हादरवून सोडणाऱ्या आयुष कोमकर हत्याकांडात पोलिसांची कारवाई थांबण्याचे नाव घेत नाही. या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आता पोलिसांची नजर आणखी एका आंदेकरवर केंद्रित झाली आहे. माहितीप्रमाणे, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हिचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे या हत्याकांडातील आरोपींच्या यादीत सोनालीचे नावही समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे प्रकरण 5 सप्टेंबरच्या रात्री घडले. माजी नगरसेवक वनराज यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकर याचा मुलगा आयुष उर्फ गोविंदा कोमकर याचा निर्घृण खून केला होता. वनराजच्या हत्येत गणेश कोमकर हा प्रमुख आरोपी होता. त्यामुळे टोळीत सूडाची भावना वाढीस लागली आणि त्यातून आयुषचा बळी गेला. घटनेनंतर पुणे पोलिसांनी जलदगतीने हालचाल करत आंदेकर टोळीच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आता तपासाचा फोकस सोनालीवर आहे. तिचा हत्येच्या कटात सहभाग होता का, तिने आरोपींना मदत केली का किंवा खुनानंतर पुरावे नष्ट करण्यात ती सामील होती का, याचा तपास सुरू आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी सोनालीला अटक केली आहे.