राज्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जितू युवराज सोनेकर (वय 11) या सहावीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
जितू हा नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. तो 15 सप्टेंबर रोजी शाळेत गेला होता. मात्र, शाळा सुटल्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता मित्रांनी जितूला एका कारमध्ये बसल्याचे सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधमोहीम राबवली, परंतु जितूचा थांगपत्ता लागत नव्हता.
दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी चनकापूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनीलगतच्या शिवारात एका गुराख्याला शाळेच्या गणवेशातील लहान मुलाचा मृतदेह झुडपात दिसला. गुराख्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. काही तासांतच पोलिसांनी आरोपींना अटक करून प्रकरण उघडकीस आणले.
याप्रकरणी पोलिसांनी राहुल पाल, अरुण भारती आणि यश वर्मा (सर्व रा. चनकापूर) या तिघांना अटक केली आहे. चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, जितूच्या वडिलांना शेत विक्रीतून पैसे मिळणार असल्याची माहिती त्यांना होती.
पैशाच्या लालसेपोटी त्यांनी जितूचे अपहरण करण्याचा कट रचला होता. आरोपींनी जितूचे अपहरण करून खंडणी मागण्याचा बेत आखला होता. मात्र, अपहरण केल्यानंतर जितूने त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरून आरोपींनी जितूचा गळा आवळून खून केला.