पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांचा जोर वाढत आहे. नुकतेच नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात 19 वर्षीय आयुष कोमकरचा जीव गेला होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर तब्बल 12 गोळ्या झाडल्या, त्यापैकी नऊ गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आयुष हा आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा असल्याने टोळीने सूड उगवला. या घटनेची धग अजून थंडही झाली नसताना पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार घडला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री कोथरूडमधील शिंदे चाळ परिसरात गोळीबार झाला. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांकडून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. गाडीला पुढे जाण्यास जागा न दिल्याच्या किरकोळ वादातून हा गोंधळ वाढला अन् गोळीबारापर्यंत पोहोचला. यात प्रकाश दुरगुडे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे या घायवळ टोळीतील सदस्यांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आरोपींपैकी मयुर कुंभारेने गोळीबार केला असून तीन राऊंड फायरिंग झाल्याचे कळते. यामध्ये प्रकाश दुरगुडे यांच्या मानेला आणि पायाला गोळ्या लागल्या आहेत.