गणपती विसर्जनाच्या आदल्या रात्री पुण्यातील नाना पेठेत 20 वर्षाच्या आयुष गणेश कोमकरची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. आयुषच्या हत्येला वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून पाहिले जात आहे. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात आता मोठी अपडेट समोर आली आहे. मारेकऱ्यांनी कबूल केले आहे की, आयुषच्या खुनासाठी मामा कृष्णा आंदेकरनेच पिस्तूल दिले होते. तसेच या प्रकरणी आणखी काही खुलासे समोर आले आहेत.
पोलिसांनी कृष्णाकडे त्याचा मोबाइल मागितला असता, त्याने तो फोडून फेकून दिला असल्याचे सांगितले. तसेच ‘मकोका’ कायद्यानुसार कारवाईची नोटीसही घ्यायला नकार दिल्याची कबुली आरोपीने न्यायालयात दिली. आयुषवर गोळीबार करून त्याचा खून करण्यासाठी मारेकऱ्यांनी वापरलेले पिस्तूल कृष्णानेच दिले होते. हे पिस्तूल त्याला कोणी पुरविले तसेच गुन्हा केल्यानंतर फरारी असताना तो कुठे व कोणाच्या संपर्कात होता, या कालावधीत त्याने गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला आहे का? याबाबत तपास करत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणाऱ्या आरोपींमधील प्रमुख ‘लिंक’ असल्याचा दावाही तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.