- छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी आंदोलकांनी गोंधळ घातला. मुख्य शासकीय सोहळा फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थ उद्यानात हा सोहळा सुरू होता. पण, ते भाषणासाठी उभे राहिल्यानंतर ओबीसी आंदोलकांनी सभास्थळी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचे सांगत या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
- मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त फडणवीस यांचे भाषण सुरू होताच या कार्यक्रमात उपस्थित असलेले काही ओबीसी आंदोलक अचानक उठले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभास्थळी गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या ओबीसी आंदोलकांना बाजूला घेऊन ताब्यात घेतले. यावर फडणवीस भाषणामध्येच म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम सुरु असताना काही लोक येऊन नारेबाजी करतात. यापेक्षा स्वातंत्र्यसंग्राम सेनानींचा अपमान असू शकत नाही. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो. चार लोक येतात, अशा प्रकारे नारेबाजी करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे योग्य नाही. मी त्याबद्दल काही बोलणार नाही.
ब्रेकिंग! मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी, गोंधळ
