- राज्यात काल दुपारी अक्षरशः चित्रपटाला साजेशी घटना घडली. भरदिवसा घरफोडी करून पळ काढणाऱ्या तिघा चोरांचा ग्रामस्थ व पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून बंदोबस्त केला.
- या कारवाईत उसाच्या शेतात लपलेल्या चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला आणि त्यांना अखेर जेरबंद करण्यात आले.
- पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील दौंडज गावातील एका वस्तीवर तीन चोरांनी दरोडा टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. नीरा येथील थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची गाडी अडकली आणि ग्रामस्थांनी त्यांना गाठले. त्यावेळी चोरांनी पाठलाग करणाऱ्या तरुणांना पिस्तुलाचा धाक दाखवत दोन जण पसार झाले. मात्र वाहनचालकाला पकडण्यात आले.
- या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे व पीएसआय सर्जेराव पुजारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पसार झालेले चोर पुणे-पंढरपूर मार्गावरील जेऊरजवळील उसाच्या शेतात लपले होते. दाट उसामुळे शोधमोहीम अवघड ठरत होती. त्यामुळे सुमारे 150 ते 200 स्थानिक तरुणांनी शेताला वेढा घातला. पोलिसांनी तरुणांना थेट शेतात न शिरता फक्त परिसरात पहारा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर ड्रोन उडवून शेतातील सर्वेक्षण करण्यात आले. ड्रोनच्या कॅमेऱ्यात चोरांचा ठावठिकाणा लागताच पोलिस व ग्रामस्थांनी संयुक्त कारवाई करून त्यांना पकडले.
- पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे लखनसिंग रतपुतसिंग धुधानी (वय 35), बेहतसिंग शामसिंग कल्याणी (वय 30) आणि रत्नेश राजकुमार पुरी (वय 23) अशी आहेत. हे तिघेही संभाजीनगर येथील रहिवासी असल्याचे समजते. त्यांच्याकडून पुढील तपास सुरू असून, उर्वरित दोन साथीदारांविरुद्ध शोधमोहीम सुरू आहे.
भरदिवसा घरावर दरोडा, पोलीस अन् ग्रामस्थांचा सिनेस्टाईल पाठलाग
