राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून, पुढील तीन ते चार दिवस राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांसाठी विशेष इशारा देण्यात आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने
वर्तवला आहे. सोलापूरमध्येही जोरदार पावसाची शक्यता असून यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असला तरी, पुढील तीन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. याचा अर्थ, पुणे शहर आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



