- राज्यातील एका विवाहितेने लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यात आणि वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- मयुरी गौरव ठोसर (वय २३) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. तिने जळगाव शहरातील सुंदरमोती नगर येथील सासरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मेडिकल टाकण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत म्हणून मयुरीचा छळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. १० मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथील मयुरीचा विवाह गौरव ठोसरसोबत झाला होता. गौरव बी फार्मसी पदवीधर असून त्याला स्वतःचे मेडिकल सुरू करायचे होते. यासाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मयुरीकडे माहेरून दहा लाख रुपये आणावेत, असा दबाव टाकण्यास सुरुवात केली. पैशासाठी मयुरीवर सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
- मयुरीचा वाढदिवस ९ सप्टेंबरला साजरा करण्यात आला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी घरात कोणी नसताना तिने गळफास घेतला. मयुरीचे वडील भगवान बुडूकले आणि तिचे कुटुंबीयांनी पती गौरव ठोसर, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गौरव व त्याच्या भावाला अटक केली आहे तर एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार महिन्यापूर्वीच लग्न, सासरचा जाच
