सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे येथे सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधातील वादातून ही धक्कादायक झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून मृत युवकाचे नाव गोविंद जगन्नाथ बरगे (वय ३८, रा. दैठन, ता. गेवराई, जि. बीड) असे आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोविंद बरगे हे प्लॉटिंग व्यवसाय करत होते. व्यवसाय चांगला सुरू असतानाच त्यांची ओळख पारगाव येथील थिएटरमध्ये काम करणाऱ्या नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर जवळीक व प्रेमसंबंधात झाले. या काळात बरगे यांनी पूजा हिला सोन्याची नाणी व सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल दिला होता.
मात्र अलीकडे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्याचा समेट घडवण्यासाठी गोविंद हे सोमवारी मध्यरात्री आपल्या चार चाकी वाहनातून सासुरे येथे मुलीच्या घरी आले होते. सकाळी गावकऱ्यांनी घरासमोर गाडी उभी असल्याची माहिती पोलिसांना दिली. वैराग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, गाडीत गोविंद बरगे मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शेजारीच पिस्तूल देखील मिळाले.
प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तथापि, घटनास्थळी काही संशयास्पद बाबी आढळल्याने हा खून आहे की आत्महत्या, याची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणी बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर तसेच वैराग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहे.
सासुरे गावात प्रेमसंबंधातून माजी उपसरपंचाने गोळी झाडून स्वत: ला संपवले?