पुण्यातील गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा आंदेकर टोळीचे सावट दिसून आले आहे. गेल्या वर्षभरापासून बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील सदस्यांनी अखेर शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आयुष गणेश कोमकर या तरुणावर गोळ्या झाडून त्याचा खून केला.
पुणे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हल्ल्याचा कट तब्बल एक वर्षांपासून रचला जात होता. आंदेकर टोळीतील काही सदस्यांवर पूर्वी देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो अयशस्वी ठरला. मात्र, या वेळी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
टोळीतील चार सदस्यांनी आयुषवर गोळ्या झाडल्या. दरम्यान पोलिसांनी त्वरित कारवाई करत यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे या दोन आरोपींना अटक केली आहे. तर उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार यापूर्वी विविध गुन्हे दाखल झालेले आहेत. हे दोघे टोळीचे सक्रिय सदस्य असून त्यांना शस्त्रे पुरवणाऱ्या अमन युनूस पठाण याच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 11 आरोपींवर गुन्हे दाखल झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेण्यास विशेष पथके तयार करत आहेत.