पुणे शहरातील नाना पेठ परिसरात शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाची गोळ्या घालत हत्या करण्यात आली आहे. ही घटना गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाशी जोडलेली असल्याचे पोलिसांना संशय आहे.
हत्या झालेल्या तरुणाचे नाव गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर (वय 18-20 वर्षे) असे असून, तो वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर गँगने हा कट रचल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आंदेकर गँगचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर यांच्यासह 11 जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर (वय 37) यांनी तक्रार दाखल केली आहे.
आयुषच्या हत्येचा गुन्हा कोणा-कोणावर दाखल झाला आहे?
सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर (गँग प्रमुख), कृष्णा आंदेकर (बंडू यांचा मुलगा), शिवम आंदेकर (पुतण्या), स्वराज वाडेकर (नातू), तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान (गोळीबार करणारा), यश सिद्धेश्वर पाटील (गोळीबार करणारा), यापैकी दोन महिलाही (वृंदावनी वाडेकर आणि लक्ष्मी आंदेकर) आरोपी आहेत. गोळीबार करणाऱ्या आरोपींना टोळीतील इतर सदस्यांनी मदत केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.