पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. नाना पेठ परिसरात आज उशिरा झालेल्या हल्ल्यात गणेश कोमकर याच्या मुलाचा खून करण्यात आला.
मृताचे नाव गोविंद कोमकर असे असून तो आंदेकर विरोधी गटाशी संबंधित असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
वनराज यांच्या हत्येत गणेश कोमकर हा मुख्य आरोपी मानला जातो. या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गटाने रेकी करून गोविंदला टार्गेट केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे टोळीने रेकी एका भागात केली व प्रत्यक्ष टार्गेट दुसऱ्या ठिकाणी साधले. त्यामुळे पोलिसांनाही गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा झाला आहे.
या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आंदेकर टोळी व कोमकर गट यांच्यातील वैर रक्तरंजित स्वरूपात समोर आल्याने नाना पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून गुन्हे शाखेकडून या हत्येचा तपास सुरू आहे.