- एका युवतीच्या खून प्रकरणातून उघड झालेली माहिती संपूर्ण राज्याला हादरवणारी ठरली आहे. अटक करण्यात आलेला दुर्वास पाटील हा एक-दोन नव्हे तर तब्बल तीन खूनांचा आरोपी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या सर्व खून प्रकरणांचा धागा त्याच्या वडिलांच्या नावावर चालणाऱ्या सायली बारपर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे दुर्वासने ज्यावेळी भक्ती मयेकर हिचा खून केला त्यावेळी ती गरोदर होती. त्यामुळे तिच्या गर्भातील बाळाचाही जीव गेला आहे.
- तपासात स्पष्ट झाले की रत्नागिरी शहर परिसरातील दुर्वास पाटीलने पहिला बळी घेतला तो सीताराम वीर (वय 50, वाटद-खंडाळा) यांचा. ते सायली बारमध्ये कामाला होते. बारमध्ये झालेल्या वादातून हात व काठीने मारहाण करण्यात आली आणि रिक्षाने घरी पाठवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील तक्रार त्यांच्या मुलाने दाखल केली होती.
- यानंतर दुसरा खून झाला राकेश जंगम (वय 28, वाटद-खंडाळा) याचा. सीताराम यांच्या मृत्यूबाबतची माहिती राकेशकडे होती. त्याने ही बाब आईला सांगितल्यानंतर तो पोलिसांकडे फिर्याद देईल, अशी भीती दुर्वासला वाटली. त्यामुळे नीलेश भिंगार्डे याच्या मदतीने आंबाघाटात त्याचा गळा आवळून खून करण्यात आला व मृतदेह टाकून देण्यात आला.
- तिसरा खून सर्वांत क्रूर ठरला. लग्नासाठी तगादा लावत असल्याने दुर्वासने आपली मैत्रीण भक्ती मयेकर (वय 26, मिरजोळे) हिचा बारच्या वरच्या खोलीत केबलने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने आंबाघाटात फेकण्यात आला. दहा दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अखेर तिचा खून झाल्याचे उघडकीस आले. धक्कादायक बाब म्हणजे भक्ती त्यावेळी गरोदर होती.
- एका खून प्रकरणात तपास सुरू असताना दुर्वासची वागणूक आणि त्याचे वाकडेतिकडे बोलणे पोलिसांना संशय आणून देत होते. अधिक चौकशी केली असता, त्याने स्वतःच तीन खुनांची कबुली दिली. या प्रकरणात दुर्वाससह विश्वास पवार व नीलेश यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
- लहानपणी आईचा मृत्यू झाल्यानंतर दुर्वास चुकीच्या मार्गावर गेला. बारमधून मिळालेला पैसा, व्यसन आणि गुन्हेगारी सवयी यामुळे त्याची हिंस्र वृत्ती वाढत गेली. पोलिसांनी त्याच्या घरातून हॉकी स्टिक आणि इतर हत्यारे जप्त केली आहेत.
राज्य हादरले! एक-दोन नव्हे तर तीन खून
