पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होताच विरोधी टोळीने बदला घेण्यासाठी खतरनाक कट रचला होता. रविवारी मध्यरात्री शस्त्रसाठ्यासह हल्ल्याची तयारी पूर्ण झाली होती. परंतु पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला. पोलिसांनी एका संशयिताला रंगेहाथ पकडले असून इतर साथीदार फरार झाले आहेत. कटाचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील कुख्यात बंडू आंदेकर आणि सूरज ठोंबरे टोळ्यांमधील वैर वाढत आहे. 2023 मध्ये आंदेकर टोळीने नाना पेठेत शुभम दहिभाते आणि निखिल आखाडे यांच्यावर हल्ला केला होता, ज्यात निखिलचा मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज यांची नाना पेठेतील डोके तालीम परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होताच गुन्हेगारी वर्तुळात बदल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आंदेकर टोळीने रविवारी मध्यरात्री हल्ल्यासाठी लक्ष्य निश्चित करून तयारी केली होती. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीमुळे त्यांचा हा कट उधळला गेला. भारती विद्यापीठ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आणि त्याच्या चौकशीतून दुसऱ्या संशयिताला पकडण्यात आले. सध्या दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड आणि इतर काही आरोपी भारती विद्यापीठ आणि आंबेगाव परिसरात राहत होते. सध्या ते येरवडा कारागृहात आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताने या परिसरात भाड्याने खोली घेतली होती. तो कोणावर तरी नजर ठेवून होता. पण त्या व्यक्तीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, पकडण्यात आलेल्या संशयिताचे आंदेकर टोळीतील काही गुन्हेगारांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.