गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. त्यांच्या समर्थनार्थ लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईत आले होते. ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण आक्रमक मराठे पाहून आता अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर तोडगा काढला आहे. महायुती सरकारने जरांगेंनी मराठा आरक्षणासंदर्भात ठेवलेल्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. ज्यामुळे याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या गोष्टीचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीसांचे असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर राऊत यांनी फडणवीसांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरणक्षाच्या मुद्द्यावर भाष्य करत म्हटले की, मुंबईत जरांगेंच्या नेतृत्वात मराठी बांधवांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या मागण्या होत्या. पावसात आणि चिखलात ते आंदोलन करत होते. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. जर आंदोलक आणि जरांगे समाधानी असतील तर आम्ही समाधानी आहोत. मुंबईत गुलाल उधळून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत. जरांगे समाधानी आहेत. आम्हीही समाधानी आहोत. मराठा समाजाच्या वेदना, क्लेश सरकारने संपवले असेल तर आम्हीही सरकारचे अभिनंदन करू, असे राऊत यांनी सांगितले.
जरांगे मुंबईत आले तेव्हा टोकाचा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपच्या लोकांनी केला. फडणवीस यांनी या सगळ्या स्थितीत संयम दाखवला. त्यामुळे मी फडणवीस यांचे कौतुक करतो, असे राऊत यांनी सांगितले.