खासदाराच्या घरात फूट, भाजपचा दणका

Admin
2 Min Read
  • महाराष्ट्रात भाजपमध्ये इनकमिंगचा वेग वाढतच चालला आहे. महायुती मजबूत करण्यासाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात सतत विरोधी पक्षातील नेत्यांचे आगमन होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडीला फटका बसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीकडून जोरदार रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसला दणका दिला आहे.
  • चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर या सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या पती व माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभा यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. परंतु याच धानोरकर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य व बाळू धानोरकर यांचे मोठे भाऊ अनिल धानोरकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनिल धानोरकर अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल झाले.
  • अनिल धानोरकर हे भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून दोन वर्षे त्यांनी शिवसेना (उद्धव गट) जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. भद्रावती नगरपरिषदेत धानोरकर कुटुंबाची दीर्घकाळ एकहाती सत्ता होती. मात्र, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना वरोरा मतदारसंघातून तिकीट नाकारले होते. त्यानंतर अनिल धानोरकर यांनी नाराजी व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
  • अनिल धानोरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका बसणार आहे. यामुळे काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. धानोरकर कुटुंबात राजकीय चुरस निर्माण झाली असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धानोरकर विरुद्ध धानोरकर अशी थेट टक्कर पाहायला मिळू शकते.
Share This Article