- निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सरकारी कार्यालयात अन् तेही चक्क खुर्चीवर बसून हिंदी चित्रपटातील गाणं म्हणण्याचा कारनामा एका तहसीलदाराने केला. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विरोधकांनीही हा मुद्दा हातोहात उचलला आणि सरकारवरच टीकेची झोड उठवली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराचा अहवाल विभागीय आयुक्तांना धाडला. या अहवालानुसार विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित केले. हिंदी चित्रपटातील गाण्याचा असाही साइड इफेक्ट दिसून आला.
- नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे तहसीलदार थोरात यांची बदली झाली होती. यानिमित्त उमरी येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत बसून त्यांनी तेरे जैसा यार कहा हे गाणे सादर केले. सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये थोरात विविध हातवारे करताना दिसत असून त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास अजिबात शोभणारे नाही, असा सूर व्यक्त करण्यात आला.
- यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना चौकशीचे आदेश दिले. थोरात यांच्या या कृतीने शासनाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. या अहवालाचा आधार घेत विभागीय आयुक्तांनी तहसीलदार थोरात यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
‘तेरे जैसा यार कहा’ गाण्यामुळे तहसीलदार निलंबित
