प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घरावर आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी जोरदार गोळीबार केला. तीन अज्ञात लोक बाईकवरून आले आणि त्यांनी दोन डझनांहून अधिक राऊंड फायरिंग केली. या घरात एल्विश आपल्या परिवारासह राहतो. ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा मात्र एल्विश घरी नव्हता. घरात फक्त त्याची आई आणि केयरटेकर होता. एल्विश सध्या परदेशात आहे. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली आहे. एल्विशचे कुटुंबीय पुरते हादरून गेले आहेत.
गुरुग्रामचे पोलीस पीआरओ संदीपकुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, एल्विशच्या घराबाहेर तीन गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गोळीबार केला. ही घटना साधारण पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात एक डझनाहून अधिक राउंड फायरिंग झाली. या गोळीबारात कुणी जखमी झाले नसले तरी घराच्या आत भिंती आणि खिडक्यांचे नुकसान झाले आहे.
हल्लेखोर नेमके कुठून आले होते. गोळीबार करून कुठे पसार झाले, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या लोकांनी काही धमकी दिली का याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे अचानक ही घटना कशी घडली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.