अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याच्या घोषणेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्रम्प यांचे नाव न घेता म्हटले आहे की, ‘सर्वांचे बॉस’ भारताच्या विकासाला स्वीकारू शकलेले नाहीत. राजनाथ यांनी टॅरिफवर जोरदार टीका करत दावा केला आहे की, कोणतीही जागतिक शक्ती भारताला महाशक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही.
राजनाथ म्हणाले की, काही लोकांना भारताची प्रगती स्वीकारता येत नाही. ते याला चांगल्या दृष्टीने पाहत नाहीत. त्यांना वाटत आहे की, ‘सर्वांचे बॉस तर आम्ही आहोत’, मग भारत इतक्या वेगाने कसा पुढे जातोय? आता भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांची दुसऱ्या देशांमध्ये निर्यात करताना, ते आणखी महाग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण ज्या गतीने भारत प्रगती करत आहे, मी तुम्हाला विश्वास देतो की कोणतीही जागतिक शक्ती आम्हाला महाशक्ती बनण्यापासून रोखू शकत नाही.