सासरच्या छळाला कंटाळून राज्यात एका विवाहित तरुणीने आत्महत्या केली आहे. स्नेहा विशाल झंडगे (मूळगाव – कर्देहळळी, ता. दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात वैष्णवी हगवणे या तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. पुण्यातील एका उच्चभ्रू कुटुंबात राहत असलेल्या वैष्णवीला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. तिच्यावर हुंड्यासाठी दबाव आणला जात होता. हे प्रकरण ताजे असताना पुण्यातील आणखी एका विवाहित तरुणीला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरात स्नेहाने आत्महत्या केली आहे. गळफास घेत तिने स्वत:चे आयुष्य संपवले. भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्नेहाच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तुला स्वयंपाक नीट करता येत नाही, माहेरातून वीस लाख रुपये घेऊन ये, असे सतत बोलले जात होते. दरम्यान स्नेहाचा पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे, सासु विठाबाई झंडगे, दीर विनायक झंडगे, नणंद तेजश्री थिटे, नंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.