पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. शिवाय, विवाहित मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांवर गुन्हे दाखल करत मुलीच्या आईसह दोन भावांना अटक केली. पोलिसांनी विवाहितेची सुटका करत तिला नवऱ्याच्या ताब्यात दिले आहे. पण आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
मुलगी प्राजक्ताचे वडील राजाराम काशीद यांनी वेगळाच दावा करताना म्हटले आहे की, तांत्रिक विद्येचा वापर करून आपल्या मुलीला जाळ्यात अडकवले आणि आपल्याला कोणतीही कल्पना न देता, हा विवाह केला आहे. शिवाय, प्राजक्ताने ज्याच्यासोबत लग्न केले, तो विश्वनाथ गोसावी हा आधीच विवाहित आहे.
त्याला दोन मुले आणि पत्नी आहे. पहिले लग्न झालेले असताना देखील विश्वनाथने आपल्या मुलीला अंधारात ठेवून आळंदीत तिला फसवून लग्न केले आहे. कोणताही भाऊ किंवा आई आपल्या मुलीचे अपहरण करू शकेल का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. या बाबाने (विश्वनाथ) पहिली बायको असताना तिच्यासोबत घटस्फोट झाला नसताना त्याने माझ्या मुलीला खोट सांगून विवाह केला आहे. या व्यतिरिक्त त्याचे विवाह झाले आहेत. मात्र, लोक पुढे येत नसल्याचा खुलासा केला आहे.
आपली मुलगी नोकरी निमित्त बंगळूरला होती. त्यामुळे त्याने मुलीला कधी महाराष्ट्रात बोलवून घेतले आणि लग्न केले, हे आम्हाला कळू दिले नाही, असेही काशीद यांनी म्हटले आहे. दरम्यान वडिलांच्या दाव्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे.