सध्या हृदयविकाराचा आजार वाढत चालला आहे. अगदी सहा वर्षांच्या चिमुकल्यांपासून साठ वर्षाच्या वृद्धांनाही हृदयविकाराचा धोका जाणवत आहे. चालता बोलता, जेवणाच्या ताटावर, जीममध्ये अन् शाळेच्या वर्गातही हृदयविकाराने जीव गेल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच धक्कादायक घटना राज्यात घडली आहे.
नाशिक शहरातील एक इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या सहावीतील मुलीचा शाळेच्या गेटवर हॉर्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आज सकाळी शाळेच्या गेटवर श्रेया हिला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली.
या घटनेनंतर शिक्षकांनी गेटवर धाव घेत श्रेयाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच श्रेयाचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयाला आधीपासूनच हृदयाचा त्रास होता. श्रेया हिच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून शाळेत हळहळ व्यक्त होत आहे.