- यूपीआय आणि इतर डिजिटल पेमेंट युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वारंवार बॅलेंस तपासणे किंवा व्यवहाराची स्थिती तपासण्यावर आता पूर्वीच्या तुलनेत मर्यादा येणार आहे. एक ऑगस्टपासून यूपीआय प्रणालीमध्ये काही नवीन बदल लागू होणार आहेत, जे तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम करतील. NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने यूपीआय नेटवर्क अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी हे बदल केले आहेत.
- एप्रिल आणि मेमध्ये यूपीआय प्लॅटफॉर्मवर प्रचंड ताण (लोड) दिसून आला. याचे मुख्य कारण म्हणजे युजर्स वारंवार बॅलन्स तपासत होते किंवा एकाच व्यवहाराची स्थिती वारंवार रिफ्रेश करत होते. यामुळे सर्व्हरवर दबाव वाढून व्यवहार उशीरा किंवा अयशस्वी होत होते. ही समस्या दूर करून प्रणाली अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी हे नवीन नियम आणले आहेत.
- कोणते बदल लागू होतील?- तुम्ही दिवसातून फक्त ५० वेळा तुमच्या बँक खात्याचा बॅलन्स तपासू शकाल. तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या बँक खात्याचे तपशील तुम्ही दिवसातून २५ पेक्षा जास्त वेळा तपासू शकणार नाही. एकाच व्यवहाराची स्थिती तुम्ही फक्त ३ वेळा तपासू शकाल, तीही प्रत्येक वेळी किमान ९० सेकंदांच्या अंतराने.
- या बदलांमुळे यूपीआय वापरणाऱ्यांना कोणतीही विशेष अडचण येणार नाही. उलट, यामुळे यूपीआय नेटवर्क अधिक सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह बनेल, ज्यामुळे तुमचे डिजिटल व्यवहार अधिक सुरळीत पार पडतील.
तुम्हीही दररोज ऑनलाईन पेमेंट करताय?
