राज्यात मध्यरात्री एक कार भरधाव निघालेली होती. दरम्यान पोलिसांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडताच मोठा कांड उघडकीस आला. पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावरील बोढरे फाट्याजवळ महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहनांची तपासणी दरम्यान ब्रेझा कारमधून कोट्यावधी रुपयांचे अंँफेटामाईन ड्रग्ज जप्त केले.
या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोढरे फाट्याजवळ मध्यरात्री वाहनांची तपासणी करत असताना दिल्ली पासिंग असलेल्या ब्रेझा कारला पोलिसांनी थांबवून कारचालकाची चौकशी करत कारची तपासणी केली यात एक निळ्या रंगाची सुटकेस बॅग पोलिसांना आढळून आली. या बॅगेची तपासणी केली असता पॅकेटमध्ये अमली पदार्थ असल्याचा संशय पोलिसांना आला.
यावरून महामार्ग पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा असल्याने फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत कार मध्ये आढळलेल्या अमली पदार्थाची पाहणी केली. फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने या आपली पदार्थाची तपासणी केली असता कारमध्ये 39 किलो अंँफेटामाईन ड्रग्ज असल्याचे आढळून आले.
त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभाव सुमारे 40 ते 50 कोटीच्या घरात असल्याचे समोर आले. याबाबत माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनद्वारे माहिती दिली. तसेच या ड्रग्स तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा संशयही आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.