- शिवसेना ठाकरे गटाला आता धक्का बसला आहे. अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांना अत्याचाराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर कोतवाली पोलीस ठाण्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी काळे यांना ताब्यात घेतले आहे.
- तक्रारदार महिलेने पोलिसांकडे दिलेल्या माहितीप्रमाणे, ती आणि तिच्या पतीमध्ये अनेक दिवसांपासून वाद आणि तणाव सुरू होता. या वादात मध्यस्थी करण्याच्या निमित्ताने काळे तिच्या संपर्कात आले आणि हळूहळू त्यांच्या ओळखीचा फायदा घेत त्यांनी अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
- पीडित महिलेच्या म्हणण्यांनुसार 2023 ते 2024 या कालावधीत काळे यांनी आपल्या कार्यालयात तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच ही माहिती इतरांना कळू नये म्हणून जीवे मारण्याची धमकीही दिली, असे तक्रारीत नमूद आहे. तक्रार दिल्यानंतर पीडित महिलेने विष घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या वैद्यकीय देखरेखेत उपचार सुरू आहेत.
- या प्रकरणामुळे नगर शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काळे हे ठाकरे गटातील एक सक्रिय आणि प्रभावी स्थानिक नेता मानले जात होते. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पती-पत्नीच्या वादात मध्यस्थ अन् डाव साधला!
