राज्यातील विविध भागात अलीकडे चोरीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान पुण्यातील एका दागिन्यांच्या दुकानात झालेल्या चोरीप्रकरणी कोलार (कर्नाटक) येथून इंजिनिअरिंगमधील टॉपर विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीईटीमध्ये टॉप स्कोअर मिळवून त्याने कोलारच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात फ्री सीटवर प्रवेश घेतला होता. पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याने तब्बल 97 टक्के गुण मिळवले होते. मात्र, पुढे त्याने गुन्हेगारीच्या वाटेवर पाऊल ठेवले आणि पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानात 4 लाख 74 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजेदरम्यान आरोपीने बुधवार पेठेतील एका दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला आणि दागिने चोरले. या घटनेत कोणताही थेट पुरावा मिळत नव्हता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत नव्हता, मात्र पोलिसांनी हुशारीने चोरीच्या आदल्या दिवसांपासूनचे जवळपास 250 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात 3 जुलै रोजी एक तरुण दुकान परिसरात संशयित हालचाली करताना दिसून आला.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपी नर्हे परिसरातून उबेर टॅक्सीने कर्नाटकमधील कोलारकडे गेल्याचे शोधून काढले. पुढे तपास करताना आरोपीचा ठावठिकाणा कोलार जिल्ह्यातील जंगम गुर्जनहल्ली गावात लागला. पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन तपास केला असता त्याच्या घरी चोरीप्रसंगी वापरलेली बॅग, सँडल, कॉलेजचे आयकार्ड आणि मोबाईल सापडला. या मोबाईलमध्ये चोरी केलेल्या दागिन्यांचे फोटो आणि आरोपीच्या हाताच्या जखमेचे फोटो आढळले.
सलग चार दिवस विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पथकाने गांधीनगर (कोलार) येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी गेलेला 4 लाख 74 हजार रुपयांचा संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.