विधानसभेच्या निवडणुका होऊन सात-आठ महिने झाले आहेत. त्यानंतर या निवडणूक निकालांवर चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील पराभवावर मत व्यक्त केले आहे. ‘सामना’ दैनिकात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीतील मतभेदांवर निवडणुकीतील पराभवाचे खापर फोडले आहे. खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारने केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले, असे म्हणत ती चूक मान्य केली.
लोकसभेत विजय आणि विधानसभेत पराभव झाल्याबद्दल राऊत यांनी उद्धव यांना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव यांनी सांगितले की, ईव्हीएमच्या घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. मतदार याद्यांवर त्याच्याबद्दलही चर्चा आहे. बोगस मतदार, मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आले आहे.
आघाडीतील मतभेदांवर बोलताना उद्धव म्हणाले, मतदारसंघ छोटा होतो, तसतशी स्पर्धा वाढते. आघाडीत दोन तीन पक्ष एकत्र आल्यावर खेचाखेची सुरू होते. युतीतही होत होती. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. त्यावेळीही शिवसेनेने जिंकलेले मतदारसंघ सोडले. विधानसभेत शेवटपर्यंत खेचाखेची सुरू होती. त्याचा दुष्परिणाम असा झाला की, जनतेला वाटले, यांच्यात आताच खेचाखेची आहे तर नंतर काय?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील फरक सांगताना उद्धव म्हणाले, लोकसभेत माझ्याकडे उमेदवार होते, जागा होती, पण निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा नव्हत्या. जागा कोणत्या हा प्रश्न होता. जागा मिळाल्या तर उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित नव्हते. तू तू मै मै झाली, ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती. ही चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.