लग्नानंतर इस्लाम धर्माचा स्वीकार कर अन्यथा अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी पत्नीने केल्याचा आरोप पीडित पतीने केला आहे. कर्नाटकातल्या गदग जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. विशाल कुमार गोकावी असे या पीडित व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे तहसीन होसमनीसोबत तीन वर्षांपासून संबंध होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. मात्र, लग्नानंतर तहसीनने मुस्लिम रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप विशाल यांनी केला आहे.
विशाल यांनी सांगितले की, संबंधांमध्ये शांतता राखण्यासाठी त्याने तहसीनचे म्हणणे मान्य केले आणि 25 एप्रिल रोजी मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न केले. पण, या समारंभात माहिती नसताना त्याचे नाव बदलण्यात आले आणि मौलवीने त्याच्या नकळत त्याचे धर्मांतर केले.
या समारंभानंतर त्यांच्या कुटुंबाने 5 जून रोजी हिंदू रितीरिवाजानुसार लग्नाची तयारी सुरू केली होती. त्यांनी आरोप केला की, तहसीनने सुरुवातीला होकार दिला होता, परंतु नंतर तिच्या कुटुंबाच्या दबावाखाली तिने माघार घेतली.
विशालने दावा केला की, तहसीनने त्यांना धमकी दिली होती की, त्याने इस्लाम धर्म स्वीकारला नाही, तर ती त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन. तहसीन आणि तिची आई बेगम बानो यांनी त्यांना नमाज पढायला आणि जमातमध्ये (धार्मिक मंडळी) सहभागी होण्यास भाग पाडले, असा आरोपही त्याने केला. दरम्यान पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.