विधानसभेत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून खळबळजनक विधान करत सर्वांचे लक्ष वेधले. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे ही ठिकाणे हनी ट्रॅप नेटवर्कची केंद्रबिंदू बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणाबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत. माझ्याकडे एक पेनड्राइव्ह आहे. पण, मी कोणाचेही चारित्र्यहनन करणार नाही. जर सरकारने परवानगी दिली तर मी तो पेनड्राइव्ह सभागृहात दाखवायला तयार आहे, असे पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले.
सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना पटोले म्हणाले की, हनी ट्रॅपच्या माध्यमातून काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना जाळ्यात ओढले जात आहे. यामागे एक संगठित रचना काम करत आहे. ही फक्त वैयक्तिक गोष्ट नाही, यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर गंभीर बाबी आहेत. पटोले यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात काही क्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या आधीही पटोले यांनी काही महत्त्वाच्या मुद्यांवरून सरकारला घेरले होते, मात्र हनी ट्रॅपसारखा संवेदनशील मुद्दा सभागृहात इतक्या थेटपणे मांडणे ही दुर्मीळ गोष्ट आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेते आणि पटोले यांनी सांगितलेला पेनड्राइव्ह प्रत्यक्षात सादर केला जातो का, याकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.